शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

आंधळी न्यायदेवता !

आंधळी न्यायदेवता !
-------------------------------
न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला अंध केलेले असते. ते किती हुबेहूब खरे आहे हे काल सहारा समूहाच्या एका केस मुळे पुढे आले आहे.
सुब्रोतो रॉय हे तीन जणांना मिळून १७ हजार कोटी रुपये देणे लागत होते व त्यासंबंधी त्यांच्यावर सेबी मार्फत कोर्टात खटला दाखल केला होता. नुकतीच सुब्रोतो ह्यांची आई वारली व तिच्या क्रियाकर्मा साठी त्यांना तुरुंगवासातून जामीनात सूट ( बेल ) पाहिजे होती. ती जामीन/बेल संपत आली होती, ती वाढवावी म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू होती. सुब्रोतो ह्यांनी कोर्टात आत्तापावेतो १२ हजार कोटी भरलेले आहेत. त्यांच्या वकिलांनी तारण म्हणून त्यांच्या एकूण आठ मालमत्तांची यादी कोर्टात दिली होती. सरकारी वकिलांचे म्हणणे, ह्या पैकी पाच मालमत्ता, आयकर विभागाने अगोदरच जप्त केलेल्या आहेत. तर सुब्रोतो ह्यांची बेल कशी वाढवायची ? ह्यावर सरन्यायाधीश ठाकूर म्हणाले की मग आम्ही सुब्रोतो ह्यांना जामीन मंजूर करीत नाही व त्यांना परत तुरुंगात पाठवतो.
ह्यावर कपिल सिबल हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर असल्याने दुसरे एक ज्येष्ठ वकील, राजीव धवन म्हणाले की त्यांच्या वकिलाला न विचारता तुम्ही असा एकतर्फी निर्णय कसा घेता व तो अन्यायकारक आहे. धवन ह्यांचा आवाज फार घन गंभीर असून ते फार रेटून बोलतात. त्यावरून सरन्यायाधीश यांना राग आला व त्यांनी सुब्रोतो ह्यांना ताब्यात घ्यावे असा निर्णय दिलाही. सकाळी केवळ तारीख मागण्याच्या विधीत हे भलतेच घडले. मग कपिल सिबल ह्यांना घाई घाईने बोलावण्यात आले व त्यांनी माफी मागितल्यावर सुब्रोतो ह्यांचा जामीन एक आठवड्याने वाढवून देण्यात आला.
मागे एका समारंभात सरकार न्यायाधीशांची नेमणूक करताना दिरंगाई करते म्हणून ह्याच सरन्यायाधीशांना स्टेजवर चक्क रडू आले होते व आज त्यांना वकील मोठ्याने बोलला म्हणून अपमान झाल्याने राग आला. खटला चोरांचा, एकाने दुसऱ्याचे पैसे देण्यावरूनचा आणि त्यात मोठ मोठे वकील, कित्येक कोटींच्या अनामती रकमा हे पाहून सामान्य लोकांनी जसे डोळे मिटले तसे आता न्यायदेवतेनेही डोळे मिटले असावे. नाही तर केवळ अनफेअर, अनजस्ट अशा शब्दांनी कोणाचा अपमान कसा होतो ? ह्यावर सरन्यायाधीश केवळ एवढेच म्हणू शकतील की त्यांच्या म्हणण्याचा टोन बघा कसा अपमान करणारा ! जेव्हा न्यायदेवता डोळ्यावर पट्टी बांधते तेव्हा केवळ कानानेच ती ऐकू शकते. म्हणूनच कदाचित कोर्ट कचेऱ्यात सुनावणी, हिअरिंग असे शब्द रुढ झाले असावेत. तसे शब्द बिचारे कायदेशीर, पण त्यांच्या उच्चाराने व टोन मुळे ते मस्तवाल वाटले तर आंधळ्या न्यायदेवतेला आपण काय म्हणणार ?
अर्ज करणारा चोर, आरोपी चोर, वकील तर काय बोलून चालून चोरांचे वकील, अशा चोरांच्या पंढरीत न्यायदेवता आंधळी झाली तेच बरे ! आता ऐका हो ऐका !
------------------------------

सोमवार, १८ मार्च, २०१३

मुकुंद टाकसाळीतले खोटे नाणे

-----------------------------------------------------
मुकुंद टाकसाळीतले खोटे नाणे
-----------------------------------------
    मुकुंद टाकसाळे हे मराठीतले मोठे सिद्धहस्त लेखक आहेत. त्यात ते उपरोधाच्या अंगाने बाजू मोठी झकास लावून धरतात. त्यामुळे लोकवाङ्मय गृहाचे "लोकवाङ्मय-वृत्त" हे नियतकालिक वाचनीय होते. त्यांनी मार्च २०१३ च्या अंकात महाराष्ट्र टाइम्सची "वेगळ्या पत्रकारितेचा श्रीगणेशा" ह्या लेखात चांगलीच खरड काढली आहे.
    गोविंद तळवलकर, कुमार केतकर ह्यांच्या परंपरेतले बुद्धिवादाला वाहिलेले हे "पत्र नव्हे मित्र" ह्या बोधवाक्याचे दैनिक आजकाल कसे खालावलेले आहे व तरीही संपादकांना खासदारकी कशी मिळाली आहे हे अतिशय उपरोधाने लेखकाने ह्यात ठसवले आहे. दै.मटाची सध्याची प्रतिमा बरी्च आंग्लाळलेली आणि "मॉल"वाली झालेली आहे हा फरक टाकसाळे ह्यांनी खूपच बोलकेपणे दाखवलेला आहे. मटा गेली दहा वर्षे त्यांच्या शीर्षकात रोज वेगवेगळ्या गणपतींची चित्रे छापतात व म्हणून ते आता कसे सेक्युलर राहिलेले नाहीत असा मुद्दा टाकसाळेंनी इथे लावून धरला आहे. आणि इथेच त्यांची थोडी गफलत झाली आहे असे कोणालाही पटावे.
    विनोद, उपरोध ह्यांचे आकर्षण जरा बाजूला सारून जर आपण आजच्या समाजात नजर टाकली तर दिसेल की ज्या टिळकांनी गणपती उत्सवाला सामाजिक कार्यक्रमाचे रूप दिले ते गणपतीचे दैवत आज महाराष्ट्रात जवळ जवळ सेक्युलर झालेले आहे. सिंधी लोक गणपती बसवतात, सरदारजी बसवतात, एवढेच कशाला आमच्या घाटकोपरचे कडक जैन लोकही इतर देवांना नमस्कार करीत नाहीत पण गणपतीला हटकून नमस्कारच काय नवसही करतात. मागासलेले, दलित बांधवही गणपती बसवतात. बांद्र्यात तर कित्येक असे मुसलमान आहेत की जे घरातही गणपती बसवतात. सिद्धीविनायक मंदीराशेजारी जे सार्वजनिक वर्तमानपत्रालय आहे ते एक मुसलमान खाटिकच चालवतो आहे. मी स्वत: पाहिलेले आहे की कित्येक मुसलमान लोक गणपती मंदीरात नमस्काराला जातात .मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड वगैरे आपल्या शेजारी असणार्‍या देशात गणपती हे दैवत सर्रास सगळे पुजतात .  गणपती हे दैवत असे सार्वजनिकपणेच नव्हे तर वैयक्तिक रित्याही सर्वधर्मी होत आहे. अशात केवळ मटा गणपतीची चित्रे छापते म्हणून ते सेक्युलर राहिलेले नाही असे म्हणणे बरोबर होणार नाही. टाकसाळेंना हवे असेल तर त्यांनी नास्तिकतेचा जरूर पुरस्कार करावा. मी स्वत:ही नास्तिक विचार सरणीचा आहे. पण मी जर तुकाराम व विठठलाचा उदो उदो केला तर मी कर्मठ आहे, असे मला वाटत नाही. संभाजी ब्रिगेडने जसे ब्राह्मणांनी केवळ परशुरामाची चित्रे लावल्याने ब्राह्मण संमेलनाला बोल लावावा, त्याच धर्तीचे हे मटाच्या स्खलनाचे समर्थन आहे. अमेरिका हा प्रामुख्याने नास्तिकतेला जोपासणारा देश आहे हे आपण पाहतोच, पण त्यांच्या नोटांवर "इन गॉड वि ट्रस्ट" असे लिहिलेले असल्याने किंवा त्यांनी सारखे "गॉड ब्लेस यू" म्हटल्याने काही ते धार्मिक अंगाचे होत नाही. उलट आजकाल आपलेही लोक "ब्लेस यू" हे येता जाता म्हणतातच. ओ माय गॉड, व ब्लेस यू हे आता सेक्युलरच समजायला हवेत. तसेच गणपतीचे आहे.
    पत्रकारितेतली घसरलेली इतर लक्षणे इतकी प्रचंड असताना टाकसाळेंनी केवळ गणपतीचे चित्र छापले म्हणून मटाला धार्मिक करावे हे जरा विसंगतीचेच द्योतक आहे हे कोणालाही पटावे. मराठी पत्रकारितेच्या स्खलनाची उदाहरणे टाकसाळेंना सहजी सर्वत्र दिसो येतील इतके ते सार्वत्रिक झालेले आहे . आंग्लाळलेली मराठी हे तर आताशा मराठीचे वैशिष्ट्य बनू पाहात आहे . ही सगळी लक्षणे सोडून टाकसाळेंनी केवळ गणपतीची चित्रे छापतात म्हणूण मटाला बोल लावावा हे जरा पूर्वग्रह बाळगल्यासारखे होते.
    तसे टाकसाळेंच्या टाकसाळीतून नेहमी मोलाची नाणी निघतात, पण केवळ गणपतीचे चित्र छापतात म्हणून मटाला झोडपा हे जरा घासलेले, खोटे,  नाणे ठरेल !
-----------------------------------------------